जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही मुख्यमंत्री फडणवीस

दादा सारंग • 28 October 2026, 05:33 AM

मुंबई प्रतिनिधी✍️: राज्यातील सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचा संघर्ष निश्चितच कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.




अखिल भारतीय किसान सभेच्या विविध मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अडचणीत आलेल्या उपसा सिंचन योजनांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.




दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्यात येणार आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांनुसार मिळणाऱ्या मदतीपेक्षा अधिक सहाय्य मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करणे तसेच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.




पीक कर्ज आणि सन्मान निधीबाबतही महत्त्वाचे निर्णय




‘नमो शेतकरी सन्मान निधी’ योजनेचे प्रलंबित हप्ते शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून सध्या ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जात आहे. या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याच्या मागणीवर कर्जमाफीसाठी स्थापन करण्यात आलेला मंत्रिगट चर्चा करणार असून, राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.




नवीन पीक कर्ज मंजूर करताना शेतकऱ्यांवर सिबिलची अट लादली जाऊ नये, यासाठी रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून सर्व बँकांना पत्र पाठविण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.




या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार विनोद निकोले, अपर मुख्य सचिव (महसूल) संतोष कुमार, अपर मुख्य सचिव (वने) संजय खंदारे, सचिव (कृषी) परिमल सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) लखमी गौतम, कृषी आयुक्त सूरज मांढरे, माजी आमदार जे. पी. गावित तसेच अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, अध्यक्ष उमेश देशमुख, सरचिटणीस डॉ. अजित नवले आदी उपस्थित होते.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)