जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

देवस्थान इनाम जमिनीच्या वादावरून टेंगशे कुटुंबीयांचे उपोषण

दादा सारंग • 27 November 2026, 02:06 PM

वेंगुर्ला प्रतिनिधी : कोचरा-भटवाडी येथील श्री देव निरंकार देवस्थानच्या इनाम जमिनीच्या मालकी हक्कावरून निर्माण झालेला वाद आता आंदोलनाच्या माध्यमातून चिघळला आहे. देवस्थानच्या जमिनीची कथित नियमबाह्य विक्री आणि महसूल दप्तरी करण्यात आलेल्या फेरफाराविरोधात देवस्थानचे व्यवस्थापक श्रीकृष्ण टेंगशे यांनी अखेर उपोषणाचे हत्यार उपसले आहे. गुरुवारी संविधान दिनाचे औचित्य साधून टेंगशे कुटुंबीयांनी आपल्या ८० वर्षीय वृद्ध मातेसह बेमुदत उपोषणाला सुरुवात केली.




या आंदोलनाची दखल घेत वेंगुर्ल्याचे तहसीलदार ओंकार ओतारी यांनी नायब तहसीलदार राजन गवस यांच्यासमवेत उपोषणस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी टेंगशे कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. मात्र, मागण्यांबाबत ठोस आश्वासन मिळाले नसल्याने कुटुंबीयांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिला आहे. वेंगुर्ला पंचायत समितीचे उपसभापती सचिन देसाई यांनीही आंदोलनस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली.




टेंगशे कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कोचरा गावच्या रहाटीतील श्री देव निरंकार देवस्थानच्या पूजाअर्चा आणि देखभालीसाठी राखीव असलेल्या सर्व्हे क्रमांक ६५/१, ६५/२ आणि ७४/१८ या जमिनी गेल्या सहा पिढ्यांपासून त्यांच्या कुटुंबाच्या वहिवाटीत आहेत. मात्र, या जमिनींची नियमबाह्य पद्धतीने विक्री करण्यात आली असून, त्यानंतर महसूल अभिलेखातही चुकीचे फेरफार झाल्याचा त्यांचा आरोप आहे.




या प्रकरणातील महसूल विभागाचा पूर्वीचा वादग्रस्त आदेश रद्द करून जमिनींचे मूळ अभिलेख पूर्ववत करावेत, अशी मागणी टेंगशे कुटुंबीयांकडून सातत्याने केली जात होती. यासाठी प्रशासनाला निवेदन देऊन २६ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र, अपेक्षित कार्यवाही न झाल्याने अखेर त्यांनी आंदोलन सुरू केले.




देवस्थान इनाम व डोंगरपड जमिनींसंदर्भात मंजूर करण्यात आलेले '३२-म' विक्री प्रमाणपत्र आणि त्यानुसार गाव दप्तरी करण्यात आलेली नोंद रद्द करावी, नियमबाह्य फेरफार हटवून सातबारा, आठ-अ तसेच अन्य महसूल अभिलेख मूळ स्थितीत आणावेत, याशिवाय जुन्या कार्यालयीन अभिलेखांच्या आधारे देवस्थानच्या नावातील त्रुटी दुरुस्त कराव्यात, अशा प्रमुख मागण्या टेंगशे कुटुंबीयांनी प्रशासनाकडे केल्या आहेत.




आता या प्रकरणात महसूल प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि टेंगशे कुटुंबीयांच्या मागण्यांवर काय निर्णय होतो, याकडे कोचरा परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)