वेंगुर्ला प्रतिनिधी✍️ : शेतीशी प्रत्यक्ष जोडलेल्या महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महिला शेतकरी प्रमाणपत्र नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ शहरी भागातील महिलांनाही मिळावा, या उद्देशाने लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ला यांच्या पुढाकारातून वेंगुर्ले नगरपरिषद आणि अनुलोम संस्थेच्या सहकार्याने सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी महिला शेतकरी प्रमाणपत्र शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता वेंगुर्ले नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद सभागृहात हे शिबिर होणार आहे.
वेंगुर्ला शहरात वास्तव्यास असलेल्या अनेक महिलांचा शेतीशी प्रत्यक्ष संबंध आहे. काही महिलांच्या कुटुंबाची शेती ग्रामीण भागात असून, काही महिला स्वतः शेतीकामांसह शेतीपूरक व्यवसायांमध्ये सक्रिय आहेत. मात्र, शहरी भागात वास्तव्य किंवा सातबारा उताऱ्यावर स्वतःचे नाव नसल्यामुळे अनेक महिलांची शेतकरी म्हणून अधिकृत नोंद झालेली नाही. अशा महिलांना शेतकरी म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
विशेष म्हणजे, महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना संबंधित महिलेच्या स्वतःच्या नावावर सातबारा उतारा असणे अनिवार्य नाही. प्रत्यक्ष शेती किंवा शेतीपूरक कामांमध्ये सहभागी असलेल्या महिलांनाही या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. त्यामुळे शहरात राहणाऱ्या महिलांनीही आपण या योजनेसाठी पात्र नाही, असा गैरसमज करून न घेता या संधीचा लाभ घ्यावा.
प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करताना अर्जदार महिलेचे आधार कार्ड आणि आधारशी संलग्न असलेला सक्रिय मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. अर्जामध्ये गाव, तालुका, जिल्हा, ग्रामपंचायतीचा तपशील तसेच संबंधित महिला करीत असलेल्या शेती व शेतीपूरक कामांची माहिती द्यावी लागणार आहे. कुटुंबातील जवळच्या सदस्याकडे फार्मर आयडी असल्यास त्याचा क्रमांकही अर्जात नमूद करता येईल. या प्रक्रियेसाठी स्वतंत्र कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता नसून, आधार ई-केवायसीसाठी संमती आणि स्वयंघोषणापत्राची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
महिला शेतकरी प्रमाणपत्रामुळे शेतीशी संबंधित महिलांची अधिकृत शेतकरी म्हणून नोंद होण्यास मदत होणार आहे. तसेच कृषी क्षेत्रातील विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवण्याच्या दृष्टीनेही या प्रमाणपत्राचे महत्त्व आहे.
तरी वेंगुर्ला शहरातील शेती आणि शेतीपूरक व्यवसायांशी संबंधित महिलांनी सोमवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता स्वामी विवेकानंद सभागृह, वेंगुर्ले नगरपरिषद येथे उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन लक्ष्मी आधार सेवा फाउंडेशन, वेंगुर्ले नगरपरिषद आणि अनुलोम संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.