सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : वन्यप्राण्यांच्या अवयवांची अवैध विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय तस्करी रॅकेटचा सावंतवाडी वनविभागाने पर्दाफाश केला आहे. कुडाळ आणि वेंगुर्ले येथे सापळा रचून केलेल्या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून वाघाचा सुळा, बिबट्याची नखे तसेच सोन्यामध्ये मढवलेले वन्यप्राण्यांचे सुळे जप्त करण्यात आले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी कुडाळ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे रोहिदास हरिश्चंद्र कामत (वय ४८, रा. कामतवाडी, वायंगणी, ता. वेंगुर्ला), विजय रविकांत शिंदे (वय ३१, रा. मुळदे, ता. कुडाळ) आणि मुनाफ इस्माईल मुकादम (वय ४०, रा. अनपूर, विजयदुर्ग, ता. देवगड) अशी आहेत. यातील रोहिदास कामत हा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वेंगुर्ला बसस्थानकात शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती वनविभागाने दिली.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य संशयित रोहिदास कामत याने पैशांच्या लोभापोटी वन्यप्राण्यांचे अवशेष विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. याची माहिती मिळाल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. सुरुवातीला आरोपीने वेंगुर्ला बसस्थानक येथे भेटण्यास बोलावून १२ वाघनखांच्या विक्रीसाठी अडीच लाख रुपयांचा व्यवहार निश्चित केला होता.
त्यानंतर कुडाळ बसस्थानकातील काळप नाका परिसरात वाघनखे दाखविण्याचे ठरले. रोहिदास कामत याने आपल्या साथीदारांमार्फत हा मुद्देमाल दाखविण्याची व्यवस्था केली. याच वेळी दबा धरून बसलेल्या वनविभागाच्या पथकाने कुडाळ बस डेपोच्या प्रवेशद्वारावर तिघांनाही रंगेहात पकडले.
संशयितांची अंगझडती घेतली असता, वाघाचा पाच सेंटीमीटर लांबीचा एक सुळादात, बिबट्याची प्रत्येकी चार सेंटीमीटर लांबीची दोन नखे आणि सोन्यामध्ये मढवलेले दोन सेंटीमीटर लांबीचे वन्यप्राण्यांचे दोन सुळेदात असा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत अनुसूची एकमध्ये संरक्षित असलेल्या वन्यप्राण्यांशी संबंधित असून, त्यांची शिकार करून अवशेष मृगयाचिन्हांच्या स्वरूपात विक्रीसाठी बाळगल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी वनपाल नेरूर तर्फ हवेली यांनी गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही संशयितांना अटक करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुडाळ यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी क्रमांक एक व दोन यांना दोन दिवसांची वन कोठडी, तर तिसऱ्या आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक मिलीश शर्मा आणि अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. सुनील लाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये कुडाळचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन पाटील, वनपाल संजय हजारे, सूर्यकांत सावंत, पोलीस हवालदार गौरेश राणे, वनरक्षक अतुल खोत, ब्रह्मकुमार भोजने, अनिकेत माने, समीर खरवत, प्रवीण कमळकर आणि वाहनचालक राहुल मयेकर यांनी सहभाग घेतला.
गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेला लागून असलेला सिंधुदुर्ग जिल्हा पश्चिम घाटाच्या जैवविविधतेने समृद्ध असून, विविध व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा महत्त्वाचा वन्यजीव कॉरिडॉर आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांची शिकार आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी सावंतवाडी वनविभागाने विशेष मोहीम अधिक तीव्र केली आहे. वन्यप्राण्यांची शिकार किंवा अवयवांच्या तस्करीसंदर्भात कोणतीही माहिती नागरिकांकडे असल्यास त्यांनी वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रभारी उपवनसंरक्षक किरण जगताप यांनी केले आहे.