सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: जिल्ह्यात संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी आणि नैसर्गिक खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी सावंतवाडी वन विभागाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वन्यप्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विभागामार्फत जिल्हास्तरीय कृती दलाची (District Level Task Force) स्थापना करण्यात आली आहे.
या कृती दलाच्या माध्यमातून वनक्षेत्रातील जलस्रोतांचे संवर्धन, वनराई बंधाऱ्यांची निर्मिती, वनाग्नी प्रतिबंधक उपाययोजना तसेच नैसर्गिक चारा व खाद्यस्रोतांचे संरक्षण करण्यावर भर दिला जाणार आहे.
या कृती दलाच्या अध्यक्षपदी उपवनसंरक्षक, सावंतवाडी वन विभाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहाय्यक वनसंरक्षक, उपविभाग क्रमांक १ हे सदस्य सचिव, तर सहाय्यक वनसंरक्षक, उपविभाग क्रमांक २ हे सहसदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. सावंतवाडी, दोडामार्ग, आंबोली, कुडाळ, कणकवली आणि कडावल या सहा वनपरिक्षेत्रांचे वनपरिक्षेत्र अधिकारी या कृती दलाचे सदस्य असणार आहेत.
४०० हून अधिक वनराई बंधाऱ्यांची निर्मिती
वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांना वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन, पाणीसाठ्यांची निर्मिती, जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून जिल्ह्यात आतापर्यंत ४०० हून अधिक वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी अडवून स्थानिक स्तरावर साठवणे शक्य होणार असून, वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
वनाग्नी रोखण्यासाठी विशेष उपाययोजना
वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनक्षेत्रातील वणव्यांच्या घटना रोखणे आणि आग लागल्यास तातडीने नियंत्रण मिळवणे यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे. यासाठी अग्निरेषांची निर्मिती व देखभाल, संवेदनशील वनक्षेत्रांमध्ये नियमित गस्त, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आग नियंत्रणासाठी तातडीची कार्यवाही केली जाणार आहे. वनाग्नीमुळे वन्यप्राण्यांचा अधिवास, नैसर्गिक खाद्यस्रोत आणि जैवविविधतेचे नुकसान होऊ नये, यासाठी विशेष दक्षता घेतली जाणार आहे.
नैसर्गिक चारा व खाद्यस्रोतांचे संवर्धन
वनक्षेत्रातील वन्यप्राण्यांना नैसर्गिक अन्न उपलब्ध राहावे, यासाठी गवताळ प्रदेशांचे संवर्धन, खाद्य वनस्पतींचे संरक्षण आणि नैसर्गिक वनस्पतींच्या वाढीस प्रोत्साहन देणाऱ्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. यामुळे वन्यप्राण्यांना अन्न आणि पाण्यासाठी मानवी वस्त्यांकडे जाण्याची गरज कमी होऊन त्यांना नैसर्गिक अधिवासातच आवश्यक संसाधने उपलब्ध होण्यास मदत होईल.
दरम्यान, जिल्हास्तरीय कृती दलामार्फत प्रत्येक वनपरिक्षेत्रातील पाण्याच्या उपलब्धतेचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. जलसंधारणाची कामे, पाणीसाठ्यांची निर्मिती, वनाग्नी प्रतिबंधक उपाययोजना आणि नैसर्गिक चारा व खाद्यस्रोतांची स्थिती यांचे सातत्याने निरीक्षण केले जाणार आहे.
संभाव्य पाणीटंचाईच्या काळात वन्यप्राण्यांना पाणी व अन्नाची कमतरता भासू नये, तसेच त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने सावंतवाडी वन विभागाने जिल्हास्तरीय कृती दलाच्या माध्यमातून हा उपक्रम हाती घेतला आहे.