मिर्यालगुडा (तेलंगणा) : वडिलांचे प्रेम, त्याग आणि मुलीची जिद्द यांचा अनोखा संगम असलेली तेलंगणातील मिर्यालगुडा येथील शिवानी आणि तिचे वडील सुंकोजू व्यंकटाचारी यांची कहाणी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. जन्मापासून हाडांशी संबंधित दुर्मिळ आनुवंशिक आजाराचा सामना करणाऱ्या शिवानीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी ९० टक्के गुणांसह संपादन केली आहे.
शिवानीची हाडे जन्मापासूनच अत्यंत नाजूक असल्याने अगदी साध्या हालचालींमुळेही फ्रॅक्चर होण्याचा धोका होता. तिची शारीरिक परिस्थिती पाहून अनेकांनी तिला घरीच ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मुलीच्या शिक्षणाच्या स्वप्नांसमोर कोणतीही अडचण येऊ द्यायची नाही, असा निर्धार तिचे वडील सुंकोजू व्यंकटाचारी यांनी केला.
व्यंकटाचारी हे दुचाकी दुरुस्तीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक आणि शारीरिक अडचणींची पर्वा न करता त्यांनी आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी स्वतःला झोकून दिले. वयाच्या आठव्या वर्षापासून ते शिवानीला स्वतः उचलून शाळेत आणि पुढे महाविद्यालयात घेऊन जात होते. पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत जवळपास २० वर्षे त्यांनी हा नित्यक्रम अखंड सुरू ठेवला. लेकीच्या शिक्षणासाठी वडिलांनी घेतलेले कष्ट आणि दाखवलेली जिद्द खरोखरच प्रेरणादायी आहे.
आज शिवानीने पदव्युत्तर परीक्षेत ९० टक्के गुण मिळवत आपल्या मेहनतीचे सार्थक केले आहे. तिच्या या यशामागे स्वतःची जिद्द, चिकाटी आणि वडिलांनी घेतलेले अथक परिश्रम यांचा मोठा वाटा आहे.
शिवानीने शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता तिला चांगली नोकरी मिळावी, तिने स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि स्वावलंबी व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा आहे.
लेकीच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी तब्बल दोन दशके तिला खांद्यावर घेऊन शिक्षणाच्या वाटेवर नेणाऱ्या वडिलांचा त्याग आणि सर्व अडचणींवर मात करत यश मिळवणाऱ्या शिवानीची जिद्द समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे. या बापलेकीच्या संघर्षाला आणि यशाला खरोखरच मनापासून सलाम केला जात आहे.