जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

४९ वर्षांची रुग्णसेवा, २५ वर्षे विनामूल्य तपासणी; डॉ. शीतल शहा यांचे कार्य प्रेरणादायी!

दादा सारंग • 09 November 2026, 01:41 PM

पंढरपूर प्रतिनिधी✍️ : वैद्यकीय सेवा ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती समाजसेवेच्या माध्यमातून केली जाणारी ईश्वरसेवा आहे. वैद्यकीय ज्ञान, कौशल्य आणि अनुभवाच्या जोडीला सेवाभाव व सामाजिक बांधिलकी असेल, तर अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. पंढरपूर येथील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. शीतल शहा यांनी आपल्या कार्यातून याचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांची निःस्वार्थ रुग्णसेवा संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रासाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी काढले.




‘आरोग्य संवाद यात्रे’च्या निमित्ताने आरोग्यमंत्री आबिटकर यांनी पंढरपूर दौऱ्यात डॉ. शीतल शहा यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय सेवेची दखल घेत त्यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. डॉ. शहा गेल्या ४९ वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून, मागील २५ वर्षांपासून ते रुग्णांच्या तपासणीसाठी कोणतेही मानधन न घेता सेवा देत आहेत. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY) तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्याने त्यांनी अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू रुग्णांना मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत.




पंढरपूर येथील त्यांच्या प्रगत बालरोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात २०१६ पासून आतापर्यंत १० हजारांहून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. यामध्ये ८५ बाल हृदयविकार शस्त्रक्रिया आणि १३० हायपोस्पेडिया शस्त्रक्रियांचा समावेश आहे. बालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी रुग्णालयात अत्याधुनिक नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU), बाल अतिदक्षता विभाग (PICU), सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग आणि चोवीस तास आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.




शासकीय आरोग्य योजना, खासगी वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम केल्यास समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही दर्जेदार आरोग्यसेवा मिळू शकते, हे डॉ. शीतल शहा यांच्या कार्यातून अधोरेखित होते. आधुनिक वैद्यकीय सुविधांसोबतच सेवाभाव, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी यांची सांगड घातल्यास आरोग्यसेवेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे शक्य आहे, असेही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी स्पष्ट केले.




गेल्या साडेचार दशकांहून अधिक काळ रुग्णसेवेला प्राधान्य देत, गेली २५ वर्षे विनामूल्य तपासणी करून आणि हजारो यशस्वी शस्त्रक्रियांच्या माध्यमातून डॉ. शीतल शहा यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी कार्याचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे योगदान डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठीही निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)