जागृत महाराष्ट्र न्यूज ई-पेपर
प्रशासन

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने २ कोटींची फसवणूक; महाराष्ट्र सायबर पोलिसांनी कंपनीला मिळवून दिले १.८१ कोटी रुपये

दादा सारंग • 28 November 2026, 09:51 AM

मुंबई प्रतिनिधी✍️ : कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाचा आणि पदाचा गैरवापर करून तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे. या प्रकरणात आर्थिक फसवणुकीचा बळी ठरलेल्या मुंबईतील कंपनीला १ कोटी ८१ लाख ४४६ रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे, गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या महिनाभरात फसवणूक झालेल्या रकमेपैकी ९० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम परत मिळवण्यात आली आहे.




अशी आखली फसवणुकीची योजना




२८ ऑक्टोबर २०२६ रोजी सायबर गुन्हेगारांनी कंपनीतील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवून कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला. कंपनीच्या महत्त्वाच्या कामासाठी तातडीने पैसे हस्तांतरित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्याच्या सूचना देऊन कंपनीच्या खात्यातून तब्बल दोन कोटी रुपये परस्पर वळवले.




तक्रार मिळताच पोलिसांची तपासाला गती




या घटनेनंतर २९ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८६/२०२६ दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(२), ३१९(२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६(ड) अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला.




प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सायबर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. फसवणुकीच्या पैशांचा माग काढण्यासाठी विविध बँका आणि वित्तीय संस्थांशी समन्वय साधण्यात आला. संशयित खात्यांमधील व्यवहारांचा शोध घेत संबंधित रक्कम गोठविण्याची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर आवश्यक कायदेशीर कार्यवाही पूर्ण करून पैसे परत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.




न्यायालयीन आदेशानंतर कंपनीला मोठा दिलासा




या तपास आणि कायदेशीर प्रक्रियेला यश आले असून, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार १ कोटी ८१ लाख ४४६ रुपये संबंधित कंपनीच्या बँक खात्यात पुन्हा जमा करण्यात आले. त्यामुळे दोन कोटींच्या सायबर फसवणुकीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कंपनीला मोठा दिलासा मिळाला आहे.




आर्थिक व्यवहार करताना खात्री करण्याचे आवाहन




दरम्यान, कंपनीतील वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या नावाने पैसे हस्तांतरित करण्यासंदर्भात ई-मेल, संदेश अथवा अन्य माध्यमातून सूचना प्राप्त झाल्यास त्यांची अधिकृत पातळीवर खातरजमा करावी. केवळ आलेल्या संदेशावर विश्वास ठेवून कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केले आहे.




सायबर फसवणुकीची घटना घडल्यास वेळ न दवडता www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी किंवा १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




महाराष्ट्र सायबरचे मुख्यालय नवी मुंबईतील महापे येथील मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये कार्यरत आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिक आणि कंपन्यांनी आर्थिक व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाली आहे.

मूळ वेबसाईटवर सविस्तर वाचा (View Full Web Version)