युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’चा सेवाभावी जागर; ग्रामीण भागातील रुग्णांसाठी तज्ज्ञ वैद्यकीय सेवेची पर्वणी वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छांचा वर्षाव, जाहिरातींची झळाळी आणि पोस्टरबाजीचा गाजावाजा नव्हे, तर समाजऋण फेडण्याची आणि गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्याची संधी! याच सेवाभावी विचाराला कृतीची जोड देत, ‘पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ हा प्रेरणादायी संदेश घेऊन बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो रुग्णांनी या शिबिरात सहभागी होत मोफत आरोग्यसेवेचा लाभ घेतला. भाजप युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाने सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय घडवून आणला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान–२०२६’ अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहेत. भाजपा सिंधुदुर्ग आणि कोकण संस्था, मुंबई यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य शिबिरांच्या मालिकेतील दुसऱ्या दिवसाचे शिबिर बांदा जिल्हा परिषद क्षेत्रात पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ भाजप नेते श्यामकांत काणेकर आणि भाजप महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेता कोरगावकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, बांदा सरपंच प्रियांका नाईक, रुपाली शिरसाठ, उन्नती धुरी, मधुकर देसाई, ऋतिका नाईक, प्रियांका देसाई, सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुबल, शहराध्यक्ष विकी कदम, जावेद खतिब, राजाराम सावंत, शितल राऊळ, प्रसाद पावसकर, नितीन सावंत, निलेश नाटेकर, बाबा काणेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.