कुडाळ प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आवश्यक मार्गदर्शन आणि शैक्षणिक सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कुडाळमध्ये मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून सुसज्ज स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी केली आहे.
या मागणीसाठी मंदार शिरसाट यांनी मुंबई येथे मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिलिंद साटम उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच उल्लेखनीय कामगिरी करत असून, दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये जिल्ह्याचा निकाल सातत्याने चांगला लागतो. मात्र, गुणवत्ता आणि मेहनत असूनही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एमपीएससी, यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक मार्गदर्शन, आधुनिक ग्रंथालय आणि पूरक शैक्षणिक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आर्थिक परिस्थितीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याला मुंबई किंवा पुणे येथे जाऊन महागड्या खासगी शिकवणी वर्गांचा खर्च करणे शक्य होत नाही. ही वस्तुस्थिती शिरसाट यांनी निवेदनातून विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.
यापूर्वीही मंदार शिरसाट यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची दोन विशेष चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमांना मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शन केंद्राची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
कुडाळ हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मध्यवर्ती आणि महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. त्यामुळे येथे मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू झाल्यास जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शनाची संधी मिळून त्यांनाही प्रशासकीय सेवेत उच्च पदांवर पोहोचण्याचा मार्ग खुला होऊ शकतो, असे शिरसाट यांनी निवेदनात स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आणि ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षार्थींना मिळणाऱ्या संधींचे महत्त्व लक्षात घेऊन प्र-कुलगुरू प्रा. अजय भामरे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच याबाबत लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी संदीप म्हाडेश्वर, साई शिंदे आणि सागर तळेकर उपस्थित होते.