दोडामार्ग स्वरूपा सौदागर✍️ : वन्यप्राण्यांकडून पिकांचे होणारे नुकसान, नुकसान भरपाई मिळण्यास होणारा विलंब, पंचनाम्यांमध्ये कथित फेरफार तसेच वनविभागाच्या विविध योजनांबाबत करण्यात येत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग वनविभागाच्या कार्यालयासमोर सुरू असलेले शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण चौथ्या दिवशीही सुरूच आहे. सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या; मात्र या चर्चेत तोडगा न निघाल्याने उपोषण सायंकाळपर्यंत सुरू होते.
दोडामार्ग तालुक्यात हत्ती, रानडुक्कर, गवे, माकडे, साळींदर आदी वन्यप्राण्यांकडून भातशेतीसह काजू, नारळ, सुपारी, केळी आणि अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वारंवार होणाऱ्या नुकसानीनंतरही भरपाई वेळेत आणि पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे. तसेच नुकसान झाल्यानंतर पंचनामे करण्यास विलंब होणे आणि काही पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय फेरफार करण्यात आल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.
या विविध मागण्यांकडे वनविभागाचे लक्ष वेधण्यासाठी बांबर्डे येथील शेतकरी दौलत राणे, सिद्धेश राणे आणि मदन राणे यांनी बुधवारपासून वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनात विनिता घाडी, जेनिफर लोबो यांच्यासह ग्रामस्थही सहभागी झाले आहेत.
उपोषणाला सर्वपक्षीय पाठिंबा
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख संजय गवस, नगरसेवक चंदन गावकर, संदीप गवस, स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय देसाई, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबू गवस, बाळा धाऊसकर, प्रदीप चांदेलकर, सुभाष दळवी यांच्यासह अनेकांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
संजय गावडे यांची उपोषणस्थळी भेट
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपजिल्हाप्रमुख, वेंगुर्ला तालुका शेतकरी न्याय हक्क संघटनेचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यांच्यासोबत बाळू परब, युवा भारतचे तुषार परब आणि डेलिन डिसोझा उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे यांच्याशी चर्चा केल्यानंतर वनपाल शुभम वारके यांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर संजय गावडे यांनी वनपाल शुभम वारके यांच्या बदलीची मागणी केली. शेतकऱ्यांच्या तक्रारी आणि मागण्यांबाबत प्रशासनाने गांभीर्याने भूमिका घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
‘ओंकार’ हत्तीसाठी स्वतंत्र व्यवस्थेची मागणी
यावेळी ‘ओंकार’ हत्तीसाठी स्वतंत्र मेगा प्लॅन तयार करण्याची मागणी करण्यात आली. त्यासाठी १० ते १५ एकर क्षेत्र राखीव ठेवून हत्तीच्या सुरक्षित संगोपनासाठी नैसर्गिक वातावरण निर्माण करावे. तसेच चारही बाजूंनी भक्कम संरक्षक कुंपण उभारून आवश्यक सुविधांनी युक्त अशी व्यवस्था तातडीने उभारावी, अशी मागणी गावडे यांनी केली.
‘शेतकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही’
“शेतकऱ्यांवरील अन्याय सहन केला जाणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील,” असा इशारा संजय गावडे यांनी यावेळी दिला.
दरम्यान, उपोषणकर्ते आपल्या विविध मागण्यांवर ठाम असून वनविभागाकडून लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचेही संजय गावडे यांनी सांगितले.