सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मान अणसूर ग्रामपंचायतीने पटकावला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या वतीने अणसूर ग्रामपंचायतीचा विशेष सन्मान करून गौरविण्यात आले.
सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित सन्मान सोहळ्यात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साहिल, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश परब तसेच जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत हा गौरव करण्यात आला. अणसूर ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सत्यविजय गावडे यांच्यासह पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला.
यावेळी सरपंच सत्यविजय गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर गावडे, वामन गावडे, संयमी गावडे, सीमा गावडे, साक्षी गावडे, प्रज्ञा गावडे, आशासेविका अनुष्का तेंडोलकर, मदतनीस अन्नपूर्णा गावडे आणि ग्रामस्थ किरण मालवणकर आदी उपस्थित होते.
गावातील स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीने सातत्याने प्रयत्न केले. ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या एकजुटीने व सांघिक सहभागातूनच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविणे शक्य झाले, अशी भावना सरपंच सत्यविजय गावडे यांनी यावेळी व्यक्त केली.
अणसूर ग्रामपंचायतीने मिळविलेल्या या यशामुळे गावाच्या विकासकामांना आणि सामूहिक प्रयत्नांना जिल्हास्तरावर विशेष मान्यता मिळाली असून, या सन्मानामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.