कुडाळ प्रतिनिधी✍️: नवीन गाडी घेऊन देण्याच्या मागणीवरून नाराज झालेल्या १५ वर्षीय मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना कुडाळ येथे घडली. युवराज विजय परब (वय १५ वर्षे ९ महिने) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युवराज हा वडील विजय विद्याधर परब यांच्यासोबत कुडाळ येथील मेहनील प्लाझा येथे भाड्याच्या घरात राहत होता. २९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहा ते साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. युवराजने वडिलांकडे नवीन गाडी घेऊन देण्याचा आग्रह धरला होता. मात्र, वडिलांनी गाडी घेऊन देण्यास नकार दिल्याने तो नाराज झाला. त्यानंतर त्याने राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेची माहिती युवराजचे वडील विजय परब यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार ३० ऑक्टोबर रोजी पहाटे १.१९ वाजता कुडाळ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील नोंद मपोहेका रेडकर यांनी केली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार भोई करीत आहेत.
अवघ्या १५व्या वर्षी युवराजचा मृत्यू झाल्याने परब कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरातही शोककळा पसरली आहे.