सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या काजू, सुपारी, आंबा, नारळ, गावठी अंडी आणि भाजीपाला या कृषी उत्पादनांना योग्य व स्थिर बाजारभाव मिळावा, तसेच सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःची हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गोव्यातील फोंडा येथील 'गोवा बागायतदार सहकारी खरेदी-विक्री संस्था मर्यादित' या संस्थेला भेट देऊन तेथील यशस्वी कार्यपद्धतीची माहिती घेतली.
या अभ्यास दौऱ्यात जिल्हा बँकेचे संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, विविध सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, काजू प्रक्रिया उद्योजक, काजू क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रगतशील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी गोवा बागायतदार संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र सावईकर, उपाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि कार्यकारी संचालक जितेंद्र भिडे यांच्याशी शिष्टमंडळाने सविस्तर चर्चा केली. संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी कृषीमाल खरेदी-विक्री, प्रतवारी, प्रक्रिया, पॅकिंग, ब्रँडिंग आणि विपणन व्यवस्था यांची माहिती घेण्यात आली. तसेच संस्थेच्या ॲग्रो प्रोसेसिंग युनिटलाही भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची पाहणी करण्यात आली.
आठही तालुक्यांत खरेदी केंद्रे उभारण्याचे नियोजन
गोवा बागायतदार संस्थेने सहकाराच्या माध्यमातून स्वतःची स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करून ग्राहकांमध्ये विश्वासार्ह स्थान मिळवले आहे. याच धर्तीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतमालालाही मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधील काजू विक्री संघ, सहकारी संस्था, बँका आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना एकत्र आणून तालुकास्तरावर खरेदी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर जिल्हास्तरावर मध्यवर्ती यंत्रणा उभारून शेतमाल संकलन आणि विक्रीची व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे.
शेतमालाच्या नफ्यातील लाभांश थेट शेतकऱ्यांच्या खात्यात
सहकारी संस्थांच्या माध्यमातून काजू आणि सुपारीची प्रतवारी करून गुणवत्तेनुसार दर निश्चित करण्याची व्यवस्था उभारण्यात येणार आहे. आगामी हंगामापासून जिल्ह्यात किमान ५ हजार मेट्रिक टन काजू बी खरेदी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सुपारीच्या खरेदीसाठीही स्वतंत्र धोरण तयार केले जाणार आहे.
स्थानिक पातळीवर प्रक्रिया उद्योग उभारणे, उत्पादित मालाचे ब्रँडिंग करणे आणि त्याला व्यापक बाजारपेठ मिळवून देणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेतून विक्रीद्वारे मिळणारा नफा आणि लाभांश थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ कच्चा माल विकण्यापुरते मर्यादित न राहता प्रक्रिया आणि विपणनातूनही आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग खुला होणार आहे.
अभ्यास दौऱ्यात मान्यवरांचा सहभाग
या दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँकेचे संचालक गजानन गावडे, रवींद्र मडगांवकर, गणपत देसाई, विद्याधर परब, तुळशीदास रावराणे, अशोक सारंग, सुनील उकिडवे, दीपक ठाकूर, अमित आवटी, निलेश पवार, विलास ठाकूर, योगेश वालावलकर, चंद्रशेखर देसाई, डॉ. प्रसाद देवधर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.