कणकवली(प्रतिनिधी) कणकवली शहरातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाड्यांमधील अपुऱ्या भौतिक सुविधा, जीर्ण इमारती, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन देत शाळांसाठी विशेष निधी मंजूर करण्याची मागणी केली.
कणकवली शाळा क्रमांक ४ बंद झाल्याने हर्णे आळी, तेली आळी, बिजली नगर, सोनगेवाडी, नाथपै नगर व जळकेवाडी परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही शाळा कोणत्या कारणामुळे बंद झाली, याची प्रशासनाने स्पष्टता करावी, अशी मागणीही पारकर यांनी केली.
कणकवली क्रमांक १, २, ३, ५ व ६ या जि.प. शाळांच्या भौतिक सुविधांसाठी विशेष निधी उपलब्ध करून देऊन कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या शाळांच्या जमिनी व इमारतींच्या मालकीमुळे नगरपंचायतीला विकासकामे करताना अडचणी येत असल्याचे पारकर यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे शाळांचे शैक्षणिक व प्रशासकीय नियंत्रण जिल्हा परिषदेकडेच ठेवून शाळांच्या जमिनी नगरपंचायतीकडे हस्तांतरित कराव्यात, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. यामुळे नगरपंचायतीला स्वतःच्या निधीतून शाळांच्या इमारती, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, सुरक्षितता व अन्य पायाभूत सुविधा विकसित करता येतील.
विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ व आधुनिक शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी शासनाने या प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली.