जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही; गंगाराम सडवेलकर यांची ठाम भूमिका

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही; गंगाराम सडवेलकर यांची ठाम भूमिका
“

पिंगुळी पाझर तलावाच्या मोजणीवरून दोन शासकीय विभागांत समन्वयाचा अभाव; ग्रामस्थांचा संताप

कुडाळ प्रतिनिधी✍️ : पिंगुळी येथील पाझर तलावावरील कथित अतिक्रमण हटवून तलावाचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तोंडी आश्वासनावर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त न करता ठोस निर्णयाचे लेखी पत्र मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार केला. दरम्यान, तलावाच्या मोजणीसंदर्भात लघुपाटबंधारे विभाग आणि भूमिअभिलेख विभाग यांच्यात समन्वय नसल्याचे चर्चेदरम्यान स्पष्ट झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली.




'पाझर तलाव आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा', 'पाझर तलावावर अतिक्रमण करणाऱ्यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय' अशा घोषणांनी मंगळवारी कुडाळ तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला. दिवसभर प्रशासनाकडून ठोस निर्णय न झाल्याने सायंकाळच्या सुमारास संतप्त ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रवेशद्वारावर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना अडविले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.




परिस्थिती लक्षात घेऊन प्रभारी प्रांताधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी स्वतः प्रवेशद्वारावर येत ग्रामस्थांशी संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय कळविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर सायंकाळी उशिरा जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता वसंत मोहिते यांनी विभागाचा अहवाल घेऊन उपोषणस्थळी भेट दिली. त्यांनी उपस्थित ग्रामस्थांसमोर अहवालाचे वाचन केले.




या अहवालानुसार पिंगुळी येथील पाझर तलाव नैसर्गिक नसून मानव निर्मित आहे. त्यामुळे तलावापासून २०० मीटर हवाई अंतराच्या क्षेत्रात बांधकाम करता येणार नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात विकासकाकडूनही अहवाल मागविण्यात आल्याची माहिती मोहिते यांनी दिली.




दरम्यान, सोमवारी झालेल्या पाहणीमध्ये तलावातील विहिरीत पाणी उपसा करण्यासाठी तीन पंप आढळून आले होते. तसेच तलावापासून काही अंतरावर बोअरवेल असल्याचेही निदर्शनास आले होते. मात्र, या बाबींवर प्रशासन नेमकी कोणती कारवाई करणार, याबाबत उपअभियंता मोहिते यांच्याकडून स्पष्ट उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.




यानंतर प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील आणि भूमिअभिलेख विभागाचे गणेशकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या चर्चेत तलावाच्या मोजणीच्या मुद्द्यावरून लघुपाटबंधारे विभाग आणि भूमिअभिलेख विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले. लघुपाटबंधारे विभागाने तलावाच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी भूमिअभिलेख विभागाला चार वेळा पत्रव्यवहार केला असून, त्याबाबतच्या पोचपावत्याही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र, संबंधित पत्रे आपल्याला मिळाली नसल्याचे गणेशकर यांनी स्पष्ट केले. यामुळे दोन शासकीय विभागांमधील समन्वयाच्या अभावाचा फटका ग्रामस्थांना बसत असल्याची भावना व्यक्त करत उपस्थितांनी संताप व्यक्त केला.




यावेळी प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी सांगितले की, पाझर तलावाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागण्यांची प्रभारी प्रांताधिकारी म्हणून आपण दखल घेतली आहे. लघुपाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदेचा प्रस्ताव बुधवारी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. हे प्रकरण अंतिम टप्प्यात असून, नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार संबंधित दुसऱ्या पक्षालाही आपली बाजू मांडण्याची संधी देणे आवश्यक आहे. तलावाची मोजणी करण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन देत त्यांनी सडवेलकर यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.




मात्र, प्रशासनाच्या तोंडी आश्वासनावर विश्वास ठेवण्यास ग्रामस्थांनी नकार दिला. तलावाच्या संरक्षणाबाबत ठोस निर्णय घेऊन त्याचे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली. त्यामुळे गंगाराम सडवेलकर यांचे बेमुदत उपोषण कायम राहणार आहे.




उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी सडवेलकर यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी पाणीदेखील प्राशन केले नसल्याने त्यांना त्रास जाणवत होता. रात्री वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी जाऊन त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.




या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. माजी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, कुणाल किनळेकर, बाबल गवडे, दीपक गावडे, मिलिंद परब, बबन बोबाटे, दर्शन कुडव, बाबल्या दळवी, श्रेया परब, निर्मला पालकर, तुळशीदास पिंगुळकर, संजय वाळके, दीपक राऊळ, महेश धोंड, अनंत धुरी यांच्यासह पिंगुळीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




आंदोलनाची गंभीरता लक्षात घेऊन तहसील कार्यालय परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे २० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून कुडाळ पोलीस ठाण्यात आरसीपीचे विशेष पथकही सज्ज ठेवण्यात आले होते.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

सावंतवाडीत एकाच विकासकामाचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
सामाजिक

सावंतवाडीत एकाच विकासकामाचे एकाच दिवशी दोनदा भूमिपूजन; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ जाहीर; शेतकऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान
प्रशासन

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना २०२६ जाहीर; शेतकऱ्यांना ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार
राजकीय

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

ANCHOR AD SLOT