मुंबई प्रतिनिधी✍️ : मुंबई पोलीस दलाचे कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने विविध अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांची सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पांचे कार्यान्वयन आणि लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पोलीस दलाच्या कामकाजात निष्पक्षता, पारदर्शकता, गतिमानता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
मुंबई पोलीस दलाच्या दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी स्मार्ट कार्ड, पोलीस अधिकारी व अंमलदारांना टॅब्लेट वितरण, अँटी-नार्कोटिक्स तपास वाहन, मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली आणि सिटीझन ॲप अशा विविध सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे, प्रशासकीय कामकाज सुलभ करणे आणि नागरिकांना जलद व प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुंबई पोलिसांकडून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या या बदलांचे त्यांनी कौतुक केले.
'नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र' अभियानांतर्गत अंमली पदार्थांविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) मदतीने 'तपास सारथी' ही प्रणाली विकसित केली जात आहे. एफआयआर नोंदणीपासून आरोपपत्र दाखल करण्यापर्यंत तसेच पुराव्यांचे व्यवस्थापन करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एआयच्या साहाय्याने एकाच डिजिटल साखळीत आणण्याचे काम सुरू आहे.
नवीन कायद्यांनुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे 'हॅश व्हॅल्यू'च्या आधारे तपासातील संपूर्ण प्रक्रिया सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिजिटल स्वरूपात करण्यावर भर दिला जात आहे. सीसीटीव्ही यंत्रणा, कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन, डेटा डिक्रिप्शन आणि सोशल मीडिया विश्लेषण अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे रोखणे आणि गुन्ह्यांचा तपास अधिक प्रभावी करणे यासाठी मुंबई पोलीस दल डिजिटल पोलिसिंगच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमादरम्यान विविध तंत्रज्ञानाधारित प्रकल्पांच्या उभारणीत योगदान देणाऱ्या संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींचाही स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये बीईएलचे मुख्य व्यवस्थापक राकेश कुमार, वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक अनिता के. एस. आणि किशोर कुमार नारु, कॅप्सूल टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक नितीन कामत आणि अर्जुन के. आर., स्केयुटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य प्रभू आणि दीपाली केळकर तसेच मिनीटेकचे उपाध्यक्ष प्रीतम करवीर आणि प्रकल्प प्रमुख मयुर कुलकर्णी यांचा समावेश होता.
यावेळी अँटी-नार्कोटिक्स सेलच्या (ANC) ताफ्यात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या अत्याधुनिक फॉरेन्सिक वाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून सेवेत दाखल केले.
लोकार्पण करण्यात आलेल्या प्रमुख सुविधा
* डिजी आयडी स्मार्ट कार्ड : मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिकृत ओळख देणारे डिजिटल स्मार्ट ओळखपत्र.
* टॅब्लेट वितरण : पोलीस दलातील अधिकारी आणि अंमलदारांना विविध अधिकृत ॲप्लिकेशन्सचा वापर करता यावा, तसेच दैनंदिन कामकाज अधिक जलद, सुलभ आणि कार्यक्षम व्हावे यासाठी टॅब्लेटची सुविधा.
* अँटी-नार्कोटिक्स इन्व्हेस्टिगेशन व्हॅन : अंमली पदार्थांविरोधातील कारवाई आणि तपास अधिक प्रभावी करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज तपास वाहन.
* मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली (MPIS) : पोलीस दलातील विविध विभागांचे कामकाज एकाच डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून सुलभ, समन्वयपूर्ण आणि गतिमान करण्याची सुविधा.
* सिटीझन ॲप : नागरिकांना पोलीस विभागाच्या विविध सेवा आणि सुविधांचा डिजिटल माध्यमातून सहज लाभ घेता यावा यासाठी विकसित करण्यात आलेले ॲप.
या तंत्रज्ञानाधारित सुविधांमुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजाला आधुनिक डिजिटल स्वरूप प्राप्त होण्याबरोबरच गुन्हे प्रतिबंध, तपास प्रक्रिया आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये अधिक सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे.