मुंबई प्रतिनिधी✍️: व्यंगचित्रकलेचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलाकृतींचे स्वतंत्र दालन उभारण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हे दालन उभारण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
संपादक व व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. यावेळी मंत्री ॲड. आशिष शेलार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, व्यंगचित्रकला ही अत्यंत प्रभावी कला असून त्यातून एकही शब्द न वापरता एखादा विषय किंवा विचार अत्यंत नेमकेपणाने लोकांपर्यंत पोहोचविता येतो. समाजातील घडामोडी, विविध परिस्थिती आणि त्यातील विरोधाभास व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मराठी व्यंगचित्रकारांनी सातत्याने केले आहे.
व्यंगचित्रातून केवळ एखाद्या प्रसंगाचे चित्रण होत नाही, तर संबंधित व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलूही प्रभावीपणे समोर येतात. महाराष्ट्राच्या मातीत या विलक्षण कलेची परंपरा पूर्वीपासून जोपासली गेली आहे. ही समृद्ध कला आणि तिचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ हे पुस्तक निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
व्यंगचित्रकलेला प्रोत्साहन देतानाच या कलेचा इतिहास आणि योगदान जतन करण्याच्या दृष्टीने मुंबईत उभारण्यात येणारे दालन महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.