सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या मालवणी भाषेचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर प्रसार करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात स्वतंत्र ‘मालवणी संशोधन केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जिल्हा मराठी विकास केंद्रा’च्या माध्यमातून हे संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याची घोषणा उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. या केंद्राच्या माध्यमातून मालवणी भाषेचा शास्त्रीय अभ्यास, संशोधन, दस्तऐवजीकरण आणि प्रसार केला जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री सामंत यांनी ही घोषणा केली. यावेळी आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, एमआयडीसीचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. मालवणी संशोधन केंद्राची मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली होती.
मालवणी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून सिंधुदुर्गच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा आणि स्थानिक अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. या भाषेतील वैशिष्ट्यपूर्ण शब्दसंपदा, साहित्य, म्हणी, वाक्प्रचार, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक ठेव्याचे जतन करण्यासाठी या संशोधन केंद्राच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. मालवणी भाषेचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्याचे उद्दिष्टही यामागे आहे.
दरम्यान, मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर मराठीतील विविध बोलीभाषांचे स्वतंत्र शब्दकोश तयार करण्याचे काम सुरू आहे. या उपक्रमांतर्गत मालवणी भाषेचाही स्वतंत्र शब्दकोश तयार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे मालवणी भाषेतील प्रचलित आणि पारंपरिक शब्द, म्हणी, वाक्प्रचार तसेच भाषेची वैशिष्ट्ये संकलित करून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येणार आहे.
लोककला आणि स्थानिक कलाकारांच्या योगदानाला मिळणार नवी ओळख
मालवणी भाषेच्या संवर्धनाबरोबरच सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या दशावतारासारख्या पारंपरिक लोककलांच्या जतन आणि संवर्धनालाही या संशोधन केंद्राच्या माध्यमातून चालना मिळणार आहे. स्थानिक लोककला, सांस्कृतिक परंपरा आणि कलाकारांच्या कलात्मक योगदानाचे दस्तऐवजीकरण करून त्यांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
मालवणी भाषा, साहित्य, लोककला आणि सांस्कृतिक वारसा यांचे संशोधन व जतन करणारे हे केंद्र भविष्यात सिंधुदुर्गच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख अधिक व्यापक करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाषेच्या संवर्धनासोबतच स्थानिक कलाकार, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अभ्यासकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेही या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.