जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले!

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी पर्यावरणप्रेमी एकवटले!
“

तलाव परिसरातील बांधकाम प्रकल्प तातडीने थांबविण्याची मागणी; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर उपस्थित केले सवाल

कुडाळ प्रतिनिधी✍️ : पिंगुळी येथील ऐतिहासिक पाझर तलावाच्या संरक्षणासाठी आता पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला असून, तलाव परिसरात सुरू असलेला बांधकाम प्रकल्प तातडीने बंद करण्याची मागणी केली आहे. तलाव नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, त्याला पाणथळ जागा (वेटलँड) संरक्षणाचे नियम लागू होतात. केवळ संबंधित जागेचे अधिकृत नोटिफिकेशन झालेले नाही, या कारणावरून नियमांची अंमलबजावणी टाळता येणार नाही, अशी ठाम भूमिका पर्यावरणप्रेमी सचिन देसाई यांनी मांडली. गोवा राज्याने २० पाणथळ जागांचे नोटिफिकेशन केले असताना महाराष्ट्रात मात्र एकाही जागेचे नोटिफिकेशन झालेले नसल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला.




पिंगुळी पाझर तलाव बचाव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृह येथे पर्यावरणप्रेमींची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी सचिन देसाई यांच्यासह रानमाणूस प्रसाद गावडे, प्रा. डॉ. योगेश कोळी, अॅड. ओंकार केणी, मंगल डिसूझा, अनिल गावडे, मंदार गावडे आणि सर्वेश पेडणेकर उपस्थित होते.




पत्रकार परिषदेत सचिन देसाई यांनी पाणथळ जागा अधिनियम आणि त्याअंतर्गत असलेल्या संरक्षणात्मक नियमांची माहिती दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण ४३३ पाणथळ जागा असून, त्यापैकी ५७ जागा गोड्या पाण्याचे स्रोत आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार या जलस्रोतांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. पिंगुळी पाझर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे २७५ बंगल्यांचा प्रकल्प प्रस्तावित असल्याचे सांगत, या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्यामुळे तलावातील पाणी प्रदूषित होण्याचा धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




जगातील उपलब्ध पाण्यापैकी केवळ एक टक्का पाणी गोड्या पाण्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे. त्यामुळे अशा जलस्रोतांचे संवर्धन करणे अत्यंत आवश्यक आहे, असे देसाई म्हणाले. जिल्ह्यातील वालावल, पाट आणि धामापूर तलाव परिसरातही पाणथळ जागा संरक्षण नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकट्या धामापूर तलाव परिसरात नियमांचे १६ उल्लंघन झाल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यामुळे पिंगुळी तलावाच्या पर्यावरणाचे आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी संबंधित बांधकाम प्रकल्प तातडीने थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली.




रानमाणूस प्रसाद गावडे यांनी जिल्ह्यातील नैसर्गिक जलस्रोतांच्या संरक्षणाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. कर्नाटकातून येणारे पाणी दोडामार्ग तालुक्यातील विर्डी येथे वरच्या बाजूला बांध घालून अडविले जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. तसेच तिलारी नदीचे पाणी पाइपलाइनद्वारे चिपी विमानतळासाठी आणले जात असल्याने त्या मार्गावरील जमिनींचे व्यवहार होत असल्याचे त्यांनी सांगितले. दोडामार्ग तालुक्यातील तेरेखोल नदीच्या उगमस्थानाजवळ असलेल्या घारपी गावात सुमारे दोन हजार एकर क्षेत्रावर रबर लागवडीचा प्रकल्प सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. पाणथळ जागांचे संरक्षण हा केवळ पर्यावरणाचा विषय नसून सर्वसामान्यांच्या जगण्याशी निगडित प्रश्न असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.




मंदार गावडे यांनी पिंगुळी पाझर तलाव परिसरातील सुरू असलेल्या बांधकामांवरून जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले. तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बांधकामे सुरू असताना जिल्हाधिकारी आणि तहसीलदार नेमकी कोणती भूमिका घेत आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रस्तावित बंगल्यांमधून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याची विल्हेवाट कशी लावली जाणार, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. केवळ निवेदने स्वीकारून प्रशासनाची जबाबदारी संपत नाही, तर प्रत्यक्ष कारवाई होणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे या वेटलँड समितीच्या अध्यक्ष असतानाही तलावाच्या पाणलोट क्षेत्रातील बांधकामांबाबत ठोस निर्णय का घेतला जात नाही, असा सवालही त्यांनी केला.




मंगल डिसूझा यांनी भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. जलस्रोत नष्ट होत राहिल्यास आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. अॅड. ओंकार केणी यांनी पाणथळ जागांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची आणि नियमांची माहिती देत तहसीलदारांनी वेटलँड समितीचे सदस्य म्हणून आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.




दरम्यान, सर्वेश पेडणेकर यांनी सासोली येथील प्रकल्पात झालेल्या वृक्षतोडीचा संदर्भ देत, त्याच कंपनीचे कामगार आणि यंत्रसामग्री सध्या पिंगुळी येथील प्रकल्पाच्या ठिकाणी वापरली जात असल्याचा आरोप केला.




पिंगुळी पाझर तलाव हा भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा जलस्रोत असल्याने त्याचे अस्तित्व टिकवणे गरजेचे आहे. तलावाच्या पाणलोट क्षेत्राचे संरक्षण, संभाव्य प्रदूषणाला आळा आणि पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून बांधकाम प्रकल्पावर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी यावेळी पर्यावरणप्रेमींनी केली.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर
सामाजिक

कै. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या पुण्यतिथीनिमित्त २९ नोव्हेंबरला भव्य रक्तदान शिबिर

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा
सामाजिक

संविधान दिनानिमित्त वेंगुर्ल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिरेखेवर आधारित वेशभूषा स्पर्धा

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार
राजकीय

सावंतवाडीतील नवनियुक्त शिवसेना पदाधिकाऱ्यांचा वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

ANCHOR AD SLOT