सिंधुदुर्ग प्रतिनिधी✍️: कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल १८ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मागील तीन वर्षांपासून पोलिसांच्या नजरेआड असलेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबईतील मालवणी परिसरातून ताब्यात घेतले. यश विकास परब उर्फ मंगेश मारुती धुमाळ (वय ४१) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५७/२०२३ अन्वये विविध कलमांतर्गत २९ एप्रिल २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने फिर्यादी व साक्षीदारांना कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १८ लाख ६९ हजार रुपये घेत फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणात आरोपी यश विकास परब याच्याविरुद्ध सीआरपीसी कलम २९९ अन्वये दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. त्याचा समावेश जिल्ह्यातील पाहिजे आरोपींच्या अभिलेखावर करण्यात आला होता.
आरोपीचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्याच्या पार्श्वभूमीची माहिती संकलित केली. तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीच्या वास्तव्याबाबत माहिती मिळविण्यात आली. या माहितीच्या आधारे पथकाने २७ ऑक्टोबर २०२६ रोजी मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई परिसरात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीचे वास्तव्य मॅरेथॉन जिमजवळ, मालवणी मातृछाया सोसायटी क्र. ५९, रूम नं. ९, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मालवणी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही कारवाई करण्यात आली.
आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती त्याची पत्नी सुमिला रईस खान हिला समजपत्राद्वारे देण्यात आली. त्यानंतर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सनिल पाटील, सपोफौ डॉमनिक डीसोजा, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण देसाई, पोलीस हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोजा आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश्वर समजिस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली.