कुडाळ प्रतिनिधी✍️ : हृदयविकाराचा झटका किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत योग्य वेळी CPR दिल्यास एखाद्याचे प्राण वाचविणे शक्य होते. याच उद्देशाने कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या CPR जनजागृती व प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोटरी क्लब ऑफ कुडाळ, पंचायत समिती कुडाळ, राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर आणि USV Pharma Pvt. Ltd. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिरात ५५० हून अधिक जणांनी सहभाग घेत CPR चे प्रशिक्षण घेतले.
या प्रशिक्षण शिबिरात हृदयविकाराचा झटका आल्यास किंवा अचानक वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, CPR का आवश्यक आहे आणि तो योग्य पद्धतीने कसा द्यावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना केवळ माहिती देण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून CPR देण्याची पद्धत शिकविण्यात आली.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, पंचायत समितीचे सर्व सदस्य तसेच गटविकास अधिकारी प्रवीण हिर्लेकर यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक, माजी अध्यक्ष राजीव पवार, डिस्ट्रिक्ट क्लब कोऑर्डिनेटर प्रणय तेली, राजन बोबाटे, डॉ. संजय सावंत, नीता गोवेकर, राणे हॉस्पिटलचे डॉ. जी. टी. राणे, USV Pharma चे क्रांतिकुमार नागवेकर, डॉ. निशा धुरी तसेच पत्रकार उपस्थित होते. या शिबिरात मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा स्वयंसेविकांनी सहभाग नोंदविला.
यावेळी सभापती मिलिंद नाईक आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष मकरंद नाईक यांनी या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. समाजातील अधिकाधिक नागरिकांना CPR चे प्रशिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. भविष्यात एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होईल. योग्य वेळी प्रशिक्षित व्यक्तीकडून मिळालेली मदत एखाद्याचा अनमोल जीव वाचवू शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकारासह विविध वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग कधीही उद्भवू शकतात. अशा वेळी केवळ वैद्यकीय यंत्रणेवर अवलंबून न राहता सर्वसामान्य नागरिकांनाही प्राथमिक जीवनरक्षक उपायांची माहिती असणे आवश्यक आहे. याच जाणीवेतून ५५० हून अधिक जणांना देण्यात आलेले CPR प्रशिक्षण समाजासाठी मोलाचे ठरणार आहे. वेळीच केलेली मदत आणि CPR चे योग्य ज्ञान एखाद्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून नवजीवन देऊ शकते, हा महत्त्वपूर्ण संदेश या शिबिरातून देण्यात आला.