सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️: जिल्ह्यातील ज्या शस्त्र परवानाधारकांच्या परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर २०२६ रोजी संपत आहे, त्यांनी शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले आहे. नूतनीकरणासाठी विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयातील उपचिटणीस शाखेत प्रत्यक्ष सादर करावेत, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
नूतनीकरणासाठी अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत असून, सार्वजनिक सुट्ट्यांचे दिवस वगळून अर्ज स्वीकारले जाणार आहेत. एकाच वेळी मोठी गर्दी होऊ नये, यासाठी तालुकानिहाय वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार सावंतवाडी तालुक्यातील परवानाधारकांनी १, २ व ३ डिसेंबर, दोडामार्ग तालुक्यातील परवानाधारकांनी ४ व ७ डिसेंबर, वेंगुर्ला तालुक्यातील परवानाधारकांनी ८, ९ व १० डिसेंबर, कुडाळ तालुक्यातील परवानाधारकांनी ११, १४ व १५ डिसेंबर, मालवण तालुक्यातील परवानाधारकांनी १६, १७ व १८ डिसेंबर, कणकवली तालुक्यातील परवानाधारकांनी २१, २२ व २३ डिसेंबर, देवगड तालुक्यातील परवानाधारकांनी २४, २८ व २९ डिसेंबर, तर वैभववाडी तालुक्यातील परवानाधारकांनी ३० व ३१ डिसेंबर २०२६ रोजी उपस्थित राहावे.
आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक
शस्त्र परवाना नूतनीकरणासाठी परिपूर्ण माहितीसह Form A-3 सादर करणे आवश्यक आहे. अर्जावर छायाचित्र लावणे बंधनकारक आहे. तसेच शस्त्र वापरण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणित करणारे तालुका ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्याकडील S-3 नमुन्यातील प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
याशिवाय संबंधित पोलीस निरीक्षकांची स्वाक्षरी व शिक्क्यासह Form S-4, शस्त्र पडताळणी केल्याबाबत संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचे प्रमाणपत्र तसेच सरपंच, पोलीस पाटील किंवा नगराध्यक्ष यांच्याकडील रहिवासी व वर्तणुकीचा दाखला अथवा आधारकार्ड सादर करणे आवश्यक आहे. या सर्व कागदपत्रांसोबत मूळ शस्त्र परवाना जोडावा.
पाच वर्षांच्या नूतनीकरणासाठी शासनाकडे २ हजार ५०० रुपये शुल्क जमा करावे लागणार आहे. नूतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी ५०० रुपये दंड आकारण्यात येईल. विलंबाने अर्ज सादर करणाऱ्या परवानाधारकांनी विलंबाचे सबळ कारण दर्शविणारा पुरावाही अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. Form A-3 अर्ज तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पोस्टाद्वारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
शस्त्र परवाना नूतनीकरणाचे अर्ज पोस्टाद्वारे अथवा तालुक्याच्या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण केलेले शस्त्र परवाने पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार नाहीत.
त्यामुळे संबंधित शस्त्र परवानाधारकांनी आपल्या तालुक्यासाठी निश्चित केलेल्या तारखेलाच मूळ शस्त्र परवाना व आवश्यक कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथील उपचिटणीस शाखेत प्रत्यक्ष उपस्थित राहून नूतनीकरणाची कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.