सावंतवाडी प्रतिनिधी✍️ : डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या रुग्णाला मध्यरात्रीच्या सुमारास डिस्चार्ज दिल्याच्या प्रकारावरून उद्धव ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधीक्षक वर्ग एकचे डॉ. विशाल रेड्डी यांना घेराव घालत जाब विचारला.
वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील विकास बर्डे यांना शंकर कुमार नामक व्यक्तीने मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या मारहाणीत बर्डे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील शिकाऊ डॉक्टरांनी मध्यरात्री सुमारे बारा वाजता त्यांना डिस्चार्ज दिल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला.
गंभीर दुखापत झालेल्या रुग्णाला आवश्यक वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्याऐवजी घरी पाठविण्यात आल्याने नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी विकास बर्डे यांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना पुन्हा सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेनंतर रुग्णांच्या उपचारांमध्ये निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप करत ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला.
डोक्याला दुखापत झालेल्या रुग्णाला किमान २४ तास वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवणे आवश्यक असताना मध्यरात्री डिस्चार्ज देणे योग्य नाही, असे रुपेश राऊळ यांनी यावेळी सांगितले. गरीब आणि सर्वसामान्य नागरिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयावर अवलंबून असतात. त्यामुळे रुग्णांच्या उपचारांबाबत प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याचे शिकाऊ डॉक्टरांकडून सांगण्यात आल्याने शिवसैनिक अधिक आक्रमक झाले. रुग्णालयात बेडची कमतरता असेल, तर सत्ताधारी लोकप्रतिनिधी नेमके काय करतात? रुग्णालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची नाही का? असा सवाल राऊळ यांनी उपस्थित केला.
रुग्णालयातील विविध गैरसोयींमुळे सर्वसामान्य रुग्णांना त्रास सहन करावा लागत असून, यापुढे रुग्णांच्या उपचारातील निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही राऊळ यांनी दिला.
यावेळी रात्री साडेबारा वाजल्यानंतर रक्ततपासणीसाठी नमुने घेतले जात नसल्याची तसेच सोनोग्राफीची सुविधा उशिरापर्यंत उपलब्ध होत नसल्याची तक्रारही शिवसैनिकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाल रेड्डी यांच्याकडे केली. रुग्णालयातील बेडची उपलब्धता, रात्रीच्या वेळी दिले जाणारे उपचार तसेच रक्ततपासणी आणि सोनोग्राफीसारख्या आवश्यक सुविधांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली.
या सर्व समस्यांकडे आपण जातीने लक्ष देऊ आणि भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ देणार नाही, असे आश्वासन डॉ. रेड्डी यांनी दिल्यानंतर ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेराव मागे घेतला.
यावेळी जिल्हा संघटक शब्बीर मणियार, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, विधानसभा मतदारसंघ प्रमुख रुपेश राऊळ, तालुकाप्रमुख राजू शेटकर, उपतालुकाप्रमुख अशोक धुरी, नगरसेवक देवा टेमकर, विभागप्रमुख विनोद काजरेकर, नामदेव नाईक, सुनील गावडे, उपविभागप्रमुख प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, संदीप गवस यांच्यासह तुळस येथील ग्रामस्थ, रुग्ण आणि नातेवाईक उपस्थित होते.