सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : भारताच्या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. सिंधुदुर्गनगरी येथील मायनाक भंडारी सभागृहात आयोजित कार्यक्रमात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.
या कार्यक्रमादरम्यान देशाची एकता, अखंडता आणि बंधुता कायम राखण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. राष्ट्रीय एकात्मतेची भावना अधिक दृढ करण्यासोबतच देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी सदैव कटिबद्ध राहण्याची शपथ उपस्थितांनी घेतली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे यांच्यासह जिल्हा प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.