सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात जहाज बांधणी उद्योग आणि बंदर विकासाला भविष्यात मोठी चालना मिळण्याची शक्यता असून, या माध्यमातून रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. या संधींचा फायदा जिल्ह्यातील स्थानिक युवक-युवतींना मिळावा, यासाठी त्यांना आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देण्यावर जिल्हा प्रशासनाने भर द्यावा. त्याच अनुषंगाने जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘मरीन इंजिन फिटर’ आणि ‘मरीन फिटर’ हे दोन नवीन ट्रेड सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. जहाज बांधणी आणि बंदर विकासाशी संबंधित उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. ही संभाव्य गरज लक्षात घेऊन पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन करावे. त्यासाठी आवश्यक शासन मान्यता मिळविण्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील दहावी उत्तीर्ण युवक-युवतींना रोजगाराभिमुख कौशल्य प्रशिक्षणासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागू नये, तर त्यांना स्थानिक पातळीवरच प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली. जिल्ह्यातील आठ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून याच वर्षी हे अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मरीन इंजिन फिटर’ आणि ‘मरीन फिटर’ या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर युवक-युवतींसाठी रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात. खासगी व सरकारी शिपयार्ड, बंदरे, मर्चंट नेव्ही तसेच ऑइल आणि गॅस प्रकल्प अशा सागरी व औद्योगिक क्षेत्रांत त्यांना काम करण्याची संधी मिळू शकते. त्यामुळे भविष्यातील रोजगाराच्या गरजा लक्षात घेऊन जिल्ह्यातील युवकांना आतापासूनच प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी पर्यटनाशी संबंधित विविध अल्पमुदतीचे कौशल्याधारित अभ्यासक्रम सुरू करण्याबाबतही पालकमंत्री नितेश राणे यांनी सूचना केल्या. पर्यटन क्षेत्रातील रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ स्थानिक युवकांना घेता यावा, यासाठी त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. याशिवाय जिल्ह्यात इलेक्ट्रिशियन व्यवसायातील प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेता आणखी काही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या अधिकारी प्रतिभा चव्हाण, भूषण सोनवडेकर आदी उपस्थित होते.