सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : जनगणना २०२७ अंतर्गत लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पा अत्यंत महत्त्वाचा असून, या प्रक्रियेत जिल्ह्यातील प्रत्येक घर आणि प्रत्येक व्यक्तीची नोंद अचूकपणे होणे आवश्यक आहे. गणनेतून कोणतेही घर किंवा व्यक्ती वगळली जाणार नाही, याची विशेष खबरदारी घ्यावी. तसेच कामकाजादरम्यान कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण गांभीर्याने घेऊन आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडावी. जनगणनेच्या संपूर्ण प्रक्रियेत अचूकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहात १८ आणि १९ नोव्हेंबर २०२६ रोजी आयोजित लोकसंख्या गणनेच्या दोन दिवसीय अनिवासी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जनगणना महासंचलनालयाच्या सहायक संचालक तेजल कटारे आणि सांख्यिकी अन्वेषक तुषार पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे, तहसीलदार चैत्राली सावंत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व चार्ज अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, अतिरिक्त चार्ज अधिकारी, जनगणना लिपिक आणि तांत्रिक सहायक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी सांगितले की, जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील कामकाज समाधानकारक आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात प्रवेश करताना अधिक दक्षता आणि जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. लोकसंख्या गणनेचा हा टप्पा तुलनेने अधिक आव्हानात्मक असल्याने पहिल्या टप्प्यात मिळवलेली यशस्वी कामगिरी कायम ठेवत प्रत्येक व्यक्तीची माहिती अचूकपणे नोंदवली जाईल, याची खात्री करावी. जिल्ह्यात बंद घरांची संख्या अधिक असल्याने अशा प्रत्येक घराची प्रत्यक्ष खातरजमा करणे महत्त्वाचे आहे. कोणतेही घर अथवा व्यक्ती गणनेच्या प्रक्रियेतून वगळली जाणार नाही, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जनगणनेच्या कामात प्रगणक आणि पर्यवेक्षकांची भूमिका निर्णायक असणार आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष कामकाजाची पद्धत, तांत्रिक बाबी आणि नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती देणे आवश्यक आहे. सर्व चार्ज अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाचा गांभीर्याने लाभ घ्यावा आणि आपल्या कार्यक्षेत्रातील संबंधित कर्मचाऱ्यांनाही दर्जेदार प्रशिक्षण द्यावे. आगामी लोकसंख्या गणनेचे काम यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असेही जिल्हाधिकारी म्हणाल्या. यावेळी त्यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आगामी कामकाजासाठी शुभेच्छा दिल्या.
या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये जिल्हा आणि चार्ज स्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसंख्या गणना (Population Enumeration – PE) या दुसऱ्या टप्प्यातील कार्यपद्धती, तांत्रिक बाबी, माहिती नोंदणीची प्रक्रिया तसेच प्रत्यक्ष क्षेत्रीय कामकाज याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येत आहे. जनगणनेचे काम निर्धारित कालमर्यादेत, प्रभावीपणे आणि अचूक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते प्रशिक्षकांचे स्वागत करण्यात आले. जिल्हा जनगणना अधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी प्रास्ताविकातून प्रशिक्षणाचा उद्देश स्पष्ट केला. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसंख्या गणनेचा दुसरा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जिल्ह्यातील जनगणना स्मरणिकेचे अनावरण जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आगामी लोकसंख्या गणनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय बाबींचे मार्गदर्शन मिळणार आहे.
जनगणना २०२७ चे वेळापत्रक
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यातील घरयादी आणि घरगणनेचे क्षेत्रीय काम महाराष्ट्र राज्यात पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील लोकसंख्या गणना २५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत होणार आहे. त्यानंतर १ ते ५ मार्च २०२७ या कालावधीत फेरतपासणी फेरी पार पडणार आहे.
नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः नोंदविण्यासाठी स्व-गणनेचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार १० ते २४ जानेवारी २०२७ या कालावधीत नागरिकांना स्व-गणनेद्वारे माहिती भरता येणार आहे. या जनगणनेसाठी १ मार्च २०२७ रोजी मध्यरात्री १२ वाजता (००:००) ही संदर्भ वेळ निश्चित करण्यात आली आहे.