कुडाळ प्रतिनिधी✍️: वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्यात सायबर जनजागृती टेन्ट उभारण्यात आला आहे. ऑनलाइन आर्थिक फसवणूक, बनावट लिंक, ओटीपी फसवणूक, यूपीआय व्यवहारातील गैरप्रकार तसेच ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून नागरिकांनी कसे सुरक्षित राहावे, याबाबत या टेन्टच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्गच्या अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या हस्ते २८ ऑक्टोबर २०२६ रोजी या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
कुडाळ पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीच्या अनुषंगाने हा जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला. सध्या डिजिटल व्यवहारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, त्याचबरोबर सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना विविध प्रकारे लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, फसवणुकीच्या पद्धती, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी तसेच फसवणूक झाल्यानंतर तातडीने करावयाच्या उपाययोजनांची माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे.
मोबाईल बँकिंग, ऑनलाइन खरेदी, यूपीआय व्यवहार आणि सोशल मीडिया वापरताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनोळखी व्यक्तींना ओटीपी, पिन, पासवर्ड किंवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती देऊ नये. तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करणे आणि अनोळखी व्यक्तीच्या सूचनेनुसार स्क्रीन शेअरिंग ॲप डाउनलोड करणे टाळावे, याबाबतही जनजागृती केली जाणार आहे.
विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांनी कुडाळ पोलीस ठाण्यातील सायबर जनजागृती टेन्टला भेट देऊन आवश्यक माहिती घ्यावी आणि ती आपल्या कुटुंबीय व परिचितांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी विलंब न करता राष्ट्रीय सायबर आर्थिक फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा. तसेच www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. फसवणुकीनंतर तातडीने तक्रार दाखल केल्यास संबंधित रक्कम रोखण्याच्या प्रयत्नांना मदत होऊ शकते.
उद्घाटनप्रसंगी कुडाळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ‘सावध नागरिक, सुरक्षित डिजिटल व्यवहार’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवत सायबर गुन्ह्यांना आळा घालणे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.