पंढरपूर कार्तिकी एकादशी यात्रेनिमित्त २१ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागांतून लाखो भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. या भाविकांच्या प्रवासाची गैरसोय टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) सुमारे एक हजार जादा बसेसची व्यवस्था केली आहे. भाविकांना सुरक्षित, आरामदायी आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी महामंडळ सज्ज असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
यात्रेदरम्यान होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन पंढरपूर येथील चंद्रभागा बसस्थानकातून राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी अतिरिक्त बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांना आपल्या गावी परतण्यासाठीही पुरेशा बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गर्दीचे योग्य व्यवस्थापन, बसफेऱ्यांचे नियोजन आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एसटी महामंडळाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
एसटी महामंडळाच्या माध्यमातून अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. तसेच ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत दिली जाते. या सवलतींचा लाभ घेत भाविकांनी खासगी वाहनांऐवजी एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससेवेचा पर्याय निवडावा, असे आवाहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
'भक्तीचा प्रवास असो किंवा परतीची वाट, वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटीची लालपरी सदैव सज्ज आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाचा प्रवास सुरक्षित, सुखकर आणि आनंददायी व्हावा, यासाठी एसटी महामंडळ कटिबद्ध आहे,' असा विश्वासही मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला.