नांदगाव प्रतिनिधी✍️ : मुंबई-गोवा महामार्गालगत असलेल्या नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या केंद्रात कायमस्वरूपी एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत होता. आता डॉ. ऋचा कोतवाल यांची कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज केंद्रात रुजू होत पदभार स्वीकारला.
नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात यापूर्वी प्रामुख्याने कंत्राटी पद्धतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. मात्र, कंत्राटी नियुक्तीचा कालावधी संपणे किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे, यामुळे आरोग्य सेवेत सातत्य राखताना अडचणी निर्माण होत होत्या. त्याचा फटका नांदगावसह परिसरातील गावांमधील रुग्णांना सहन करावा लागत होता. त्यामुळे या आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती.
अखेर या मागणीला यश आले असून डॉ. ऋचा कोतवाल यांनी आज नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात हजर होत आपल्या कामकाजाला सुरुवात केली. त्यांच्या रुजू होण्याच्या निमित्ताने जन आरोग्य समितीचे पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
मुंबई-गोवा महामार्गालगत असलेले हे प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगावसह परिसरातील अनेक गावांमधील नागरिकांसाठी आरोग्य सेवेचे महत्त्वाचे केंद्र आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणे ही ग्रामस्थांसाठी दिलासादायक बाब ठरली आहे. आता रुग्णांना वेळेत वैद्यकीय तपासणी व उपचार मिळण्यास मदत होणार असून आरोग्य सेवेतही सातत्य राहणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या नियुक्तीबद्दल परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम, नियमित आणि दर्जेदार व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
यावेळी ओटवचे माजी सरपंच तथा जन आरोग्य समिती सदस्य हेमंत परुळेकर, ओटवचे उपसरपंच दुर्गेश ओटवकर, पत्रकार तथा जन आरोग्य समिती सदस्य ऋषिकेश मोरजकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती देसाई, आरोग्य सहाय्यक दीपक कांबळे, आरोग्य सहायिका श्रीमती पवार, फार्मासिस्ट श्रीमती कोठुरवार यांच्यासह आरोग्य केंद्रातील कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याने नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवेला आता स्थैर्य मिळेल आणि परिसरातील नागरिकांना अधिक चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, अशी आशा निर्माण झाली आहे.