आडाळी एमआयडीसीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक विकास होईल, स्थानिक युवक-युवतींना रोजगार मिळेल आणि जिल्ह्यातील तरुणांना नोकरीसाठी आपले घर, आई-वडील आणि कुटुंब सोडून परजिल्ह्यात किंवा परराज्यात जाण्याची वेळ येणार नाही, अशी अपेक्षा गेल्या अनेक वर्षांपासून सिंधुदुर्गवासीयांनी बाळगली आहे. मात्र आडाळी एमआयडीसीच्या स्थापनेपासून आजपर्यंत विविध उद्योगांच्या घोषणा होत असतानाही प्रत्यक्ष जमिनीवर उद्योग किती उभे राहिले, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
आडाळी एमआयडीसीच्या नावाने गेल्या दशकभरात विविध निवडणुकांच्या काळात उद्योग, रोजगार आणि कोट्यवधींच्या गुंतवणुकीची आश्वासने देण्यात आली. काही उद्योगांची नावे जाहीर झाली, काही प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक सांगण्यात आली, काही ठिकाणी MoU झाल्याचे जाहीर झाले; परंतु या सर्व घोषणांचे रूपांतर प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या उद्योगांमध्ये आणि स्थानिकांच्या हातातील रोजगारामध्ये किती झाले, याचा स्पष्ट हिशेब जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
प्रश्न केवळ एमआयडीसीचा नाही; तो प्रत्येक सिंधुदुर्गी कुटुंबाचा आहे
सिंधुदुर्गातील अनेक कुटुंबांसमोर रोजगाराचा प्रश्न आजही गंभीर आहे. स्थानिक पातळीवर पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे अनेक तरुणांना गोवा, कर्नाटक, गुजरात, मुंबई, पुणे तसेच इतर भागांमध्ये नोकरी किंवा व्यवसायासाठी जावे लागते.
या स्थलांतराचा परिणाम केवळ तरुणांच्या जीवनावर होत नाही, तर त्यांच्या कुटुंबावरही होतो.
आई-वडील गावाकडे आणि मुलगा किंवा मुलगी रोजगारासाठी बाहेरगावी, अशी अनेक कुटुंबांची परिस्थिती आहे. लग्न झाल्यानंतर पत्नी आणि लहान मुलांना गावात ठेवून रोजगारासाठी बाहेर जावे लागणारे तरुणही आहेत. काही कुटुंबांना आई-वडिलांची जबाबदारी असल्यामुळे दूरवर नोकरी करणेही शक्य होत नाही.
स्थानिक पातळीवर स्थिर आणि सुरक्षित रोजगार उपलब्ध झाला, तर या कुटुंबांना मोठा आधार मिळू शकतो.
रोजचा प्रवासही अनेक कुटुंबांसाठी चिंतेचा विषय
गोवा आणि इतर भागांमध्ये नोकरी करणारे अनेक स्थानिक तरुण दररोज किंवा वारंवार दुचाकीने प्रवास करतात. रोजगारासाठी केलेला हा प्रवास त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे.
मात्र दीर्घ अंतराचा प्रवास, वाहतुकीची जोखीम आणि अपघातांची शक्यता यामुळे कुटुंबीयांच्या मनात कायम चिंता असते.
रोजगारासाठी घरापासून दूर जावे लागण्याची गरजच कमी झाली आणि स्थानिक पातळीवर उद्योग उभे राहिले, तर तरुणांना आपल्या कुटुंबाजवळ राहून रोजगार करण्याची संधी मिळू शकते.
त्यामुळे आडाळी एमआयडीसी हा केवळ उद्योग उभारणीचा प्रश्न नाही; तो कुटुंबांच्या सुरक्षिततेचा, तरुणांच्या भविष्याचा आणि सिंधुदुर्गच्या आर्थिक विकासाचा प्रश्न आहे.
दहा वर्षांच्या घोषणांचा हिशेब द्या
आडाळी एमआयडीसीबाबत गेल्या काही वर्षांत सातत्याने उद्योगांच्या घोषणा झाल्या आहेत.
२०२४ मध्ये ३९ उद्योग येणार असल्याचे सांगण्यात आले.
₹२५० कोटींच्या( Aluminium Tin) प्रकल्पाची घोषणा झाली.
राष्ट्रीय वनौषधी संस्थेसाठी जमीन देण्याची प्रक्रिया झाली.
(Pharma Hub)चा प्रस्ताव पुढे आला.२०२६ मध्ये ₹१०० कोटींच्या Data Centre Container Manufacturing प्रकल्पाची घोषणा झाली.
(Automage)कडून ₹२५० कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव आल्याचे सांगण्यात आले.
₹,४,000 कोटींच्या (Solar Panel Manufacturing प्रकल्पाचा MoU) झाल्याचेही जाहीर करण्यात आले.
या सर्व घोषणा आणि प्रस्ताव निश्चितच स्वागतार्ह आहेत. परंतु आता प्रश्न असा आहे की यापैकी किती प्रकल्प प्रत्यक्ष जमिनीवर आले आहेत?
किती प्रकल्पांचे भूमिपूजन झाले?
किती प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे?
किती प्रकल्पांमध्ये यंत्रसामग्री बसविण्यात आली आहे?
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे — आज अडाळी एमआयडीसीमध्ये प्रत्यक्ष किती स्थानिक युवक काम करत आहेत?
कागदावर नको; उद्योग जमिनीवर हवा
नवीन उद्योगांसाठी होणे ही प्रक्रिया सुरू झाल्याची बाब आहे. परंतु झाल्यानंतर प्रत्यक्ष जमीन, परवानग्या, बांधकाम, यंत्रसामग्री आणि उत्पादन या टप्प्यांपर्यंत प्रकल्प पोहोचणे आवश्यक आहे.
त्यामुळे भविष्यात आडाळी एमआयडीसीबाबत कोणताही MoU किंवा गुंतवणूक प्रस्ताव जाहीर करताना त्याची कालमर्यादा, प्रकल्पाची सद्यस्थिती आणि रोजगाराचे लक्ष्य जनतेसमोर जाहीर करण्याची गरज आहे.
फक्त कागदावर करार होऊन प्रकल्प वर्षानुवर्षे प्रलंबित राहू नयेत. ज्या उद्योगांनी प्रत्यक्ष काम सुरू केले आहे त्यांची माहिती स्वतंत्रपणे आणि ज्या उद्योगांचे प्रस्ताव अद्याप प्रक्रियेत आहेत त्यांची माहिती स्वतंत्रपणे प्रसिद्ध झाली पाहिजे.
छोटे-मोठे उद्योग आधी सुरू करा
आडाळी एमआयडीसीमध्ये केवळ हजारो कोटींच्या मोठ्या प्रकल्पांची वाट पाहण्याऐवजी स्थानिक युवकांना तातडीने रोजगार देऊ शकणारे छोटे आणि मध्यम उद्योगही आणण्याची गरज आहे.
(Food processing, agro-processing, packaging, engineering, fabrication, electrical equipment, logistics, pharmaceutical-related industries, service industries) आणि इतर स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योगांना प्रोत्साहन दिल्यास रोजगारनिर्मितीची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते.
मोठ्या प्रकल्पांची घोषणा होईपर्यंत वर्षानुवर्षे वाट पाहण्यापेक्षा छोटे-मध्यम उद्योग प्रत्यक्ष सुरू करणे आणि त्यातून स्थानिक रोजगार निर्माण करणे, हा मार्गही सरकारने गांभीर्याने विचारात घ्यावा.
राज्यकर्त्यांना संजय दत्ताराम गावडे यांचा सवाल
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख संजय दतत्ताराम गावडे यांनी आडाळी एमआयडीसीच्या प्रश्नावर राज्य सरकार आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता ठोस उत्तर देण्याची मागणी केली आहे.
“सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगारासाठी आपले घर आणि कुटुंब सोडून गोवा, कर्नाटक, गुजरात, मुंबई किंवा इतर भागांमध्ये जावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी अडाळी एमआयडीसी उभारण्यात आली असेल, तर गेल्या दहा वर्षांत या एमआयडीसीने स्थानिक तरुणांना किती रोजगार दिला, याचा हिशेब राज्यकर्त्यांनी जनतेला द्यावा,” अशी मागणी संजय गावडे यांनी केली.
“दरवेळी नवीन उद्योगांची घोषणा होते. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक सांगितली जाते. झाल्याचे सांगितले जाते. मात्र जनतेला आता घोषणा नकोत; प्रत्यक्ष उद्योग हवेत. कागदावर न राहता त्याचे रूपांतर कारखान्यात आणि कारखान्याचे रूपांतर रोजगारात झाले पाहिजे,” असेही संजय गावडे यांनी म्हटले.
त्यांनी पुढे म्हटले की, “सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागू नये, आपल्या आई-वडिलांजवळ आणि कुटुंबाजवळ राहून रोजगार करता यावा, यासाठी अडाळी एमआयडीसीमध्ये तातडीने छोटे-मोठे उद्योग सुरू करण्यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवावी.”
आता घोषणांचा नव्हे, अंमलबजावणीचा हिशेब हवा
आडाळी एमआयडीसीच्या नावाने झालेल्या प्रत्येक घोषणेचा मागोवा घेण्याची वेळ आता आली आहे.
घोषणा कधी झाली?
कंपनी कोणती?
किती गुंतवणूक?
किती जमीन?
भूमिपूजन झाले का?
बांधकाम सुरू आहे का?
उत्पादन कधी सुरू होणार?
आणि स्थानिकांना किती रोजगार मिळणार?
या प्रश्नांची उत्तरे सरकारने अधिकृतपणे जाहीर करावीत.
सिंधुदुर्गच्या तरुणांचे भविष्य केवळ निवडणुकीच्या घोषणांवर अवलंबून राहू नये. गेल्या दहा वर्षांच्या आश्वासनांचा आता प्रत्यक्ष कामाशी हिशेब जुळला पाहिजे.