देवगड प्रतिनिधी✍️: देवगड ते वेंगुर्ला या सागरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या ट्रॉलरमधील मासळीची काही छोट्या नौकाधारकांकडून संघटितपणे लूट केली जात असल्याचा आरोप ट्रॉलर मच्छीमारांनी केला आहे. या प्रकाराला तातडीने आळा घालून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ट्रॉलर मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने देवगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनानुसार, देवगड ते वेंगुर्ला सागरी क्षेत्रात ट्रॉलर मच्छीमार नियोजित भागात मासेमारी करत असताना चार ते पाच छोट्या नौका एकत्र येऊन ट्रॉलरला घेराव घालतात. त्यानंतर ट्रॉलरमधील मासळी जबरदस्तीने घेऊन जाण्याचे प्रकार घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित छोट्या नौकांवर नाव अथवा नोंदणी क्रमांक नसल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी अशा प्रकारांबाबत ट्रॉलर मच्छीमारांकडून तक्रारी करण्यात आल्या नसल्याने गेल्या काही दिवसांत या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचा दावा शिष्टमंडळाने केला आहे. कथित मासळी लुटीमुळे ट्रॉलर मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत असून, मासेमारीच्या जाळ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित छोट्या नौकांचा शोध घ्यावा, तसेच मासळी लुटीमध्ये सहभागी असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनासोबत कथित लुटीमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या १३ जणांची नावे तसेच लुटून नेण्यात आलेली मासळी खरेदी करणाऱ्या मालवण येथील पाच खरेदीदारांची नावेही पोलिसांना देण्यात आली आहेत.
या संदर्भात सहदेव बापर्डेकर, द्विजकांत कोयंडे, निवृत्ती तारी, गोपीनाथ तांडेल, इतियास होलसेलर, अशोक सारंग, अनिस कोयंडे, प्रणव पारकर आणि रिहान शेख यांच्या शिष्टमंडळाने देवगड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. यावेळी कथित गैरप्रकाराबाबत चर्चा करून निवेदन साद करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.