सिंधुदुर्गनगरी प्रतिनिधी✍️ : जिल्ह्यात आंबा व काजू पिकांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली असून, काही काजूच्या झाडांवर मोहोरही दिसू लागला आहे. सध्या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही भागांत पाऊस झाल्याने आंबा व काजू पिकांवर विविध किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला यांच्यामार्फत २४ ते ३० ऑक्टोबर २०२६ या कालावधीसाठी कृषी सल्ला जाहीर करण्यात आला आहे. सहयोगी संशोधन संचालक वैभव शिंदे यांनी हा सल्ला प्रसिद्ध केला आहे.
आंब्याच्या नवीन पालवीची काळजी घेण्याचे आवाहन
आंब्याच्या अनेक बागांमध्ये मोठ्या प्रमाणात नवीन पालवी फुटली असून, उर्वरित बागांमध्येही पालवी येण्यास सुरुवात झाली आहे. या अवस्थेत तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव होऊन पालवीतील रस शोषला जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पालवीवर चिकटा पडून त्यावर काळ्या बुरशीची वाढ होऊ शकते.
नवीन पालवीवर तुडतुडे किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार डेल्टामेथ्रीन ९ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसामुळे पालवीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास थायोफिनेट मिथाइल १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात स्वतंत्रपणे फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
फवारणीचे औषध पालवीवर व्यवस्थित चिकटून समान पद्धतीने पसरावे यासाठी शिफारशीनुसार स्टिकर व स्प्रेडरचा वापर करावा. कोवळ्या पालवीवर शेंडे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास टोलफेनपायरॅड २० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी.
पालवीची जोमाने वाढ होऊन ती लवकर परिपक्व होण्यासाठी ०:०:५० आणि १३:०:४५ ही पाण्यात विरघळणारी खते प्रत्येकी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात स्वतंत्रपणे फवारावीत, असेही कृषी सल्ल्यात नमूद करण्यात आले आहे.
काजूच्या नवीन पालवीवर लक्ष ठेवण्याची गरज
काजूच्या वेंगुर्ला-१, वेंगुर्ला-४, वेंगुर्ला-७, वेंगुर्ला-९ आणि वेंगुर्ला-१० या प्रसारित वाणांना नवीन पालवी फुटण्यास सुरुवात झाली आहे. वेंगुर्ला-१ आणि वेंगुर्ला-१० या वाणांच्या काही झाडांवर मोहोरही दिसू लागला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने नवीन पालवीचे ढेकण्या किडीपासून संरक्षण करण्यासाठी लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन ६ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील १५ दिवसांत नवीन पालवीतून मोहोर येऊन त्याची वाढ होण्याची शक्यता असल्याने बागायतदारांनी विशेष दक्षता घ्यावी.
काजूच्या झाडांभोवती जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी बुंध्याभोवती जैविक आच्छादन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
काही भागांत तुरळक पाऊस; पहाटेच्या थंडीत वाढ
१६ ऑक्टोबर २०२६ रोजी मागील कृषी सल्ला जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर वातावरणात फारसा बदल झालेला नाही. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला असून पहाटेच्या वेळी थंडीत अल्पशी वाढ झाली आहे.
मागील आठवड्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दिवसभरातील हवेतील आर्द्रता कमी होऊन तापमान वाढल्याने उष्णतेची स्थिती जाणवत असल्याचे कृषी सल्ल्यात नमूद करण्यात आले आहे.