जागृत महाराष्ट्र न्यूज
newspaper ई-पेपर
search

हळदीचे नेरूर गावच्या विकासासाठी कटिबद्ध : आमदार निलेश राणे

दादा सारंग

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

हळदीचे नेरूर गावच्या विकासासाठी कटिबद्ध : आमदार निलेश राणे
“

नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन; ८ सप्टेंबर २०२७ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन

कुडाळ प्रतिनिधी✍️: हळदीचे नेरूर गावाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून, येथील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी नवीन पुलाचे काम निर्धारित मुदतीपूर्वी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. पुलाची कामाची अधिकृत पूर्णत्वाची तारीख ८ सप्टेंबर २०२७ असली तरी ठेकेदाराने मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. काम दर्जेदार होण्यासोबतच ते वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदाराकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.




हळदीचे नेरूर येथे नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, कुडाळ पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक, जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर, जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, मोहन सावंत, दिलीप सावंत, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, देवेंद्र नाईक, निवृत्त पोलीस अधिकारी सतीश कविटकर, राजा धुरी आदी उपस्थित होते.




आमदार राणे म्हणाले, “या पुलाचे काम एक वर्षाच्या आत पूर्ण व्हावे, यासाठी माझा सातत्याने पाठपुरावा राहील. ८ सप्टेंबर २०२७ ही पुलाच्या कामाची पूर्णत्वाची तारीख आहे. मात्र, ठेकेदाराने मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे स्पष्ट केले आहे. काम लवकर पूर्ण करण्यासोबतच ते दर्जेदार व्हावे, ही माझी अपेक्षा आहे.”




या पुलाच्या कामासाठी स्थानिक ग्रामस्थ दिलीप सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळेच आज या कामाचे भूमिपूजन होत असल्याचेही राणे यांनी सांगितले. “आमदार झाल्यानंतर जेव्हा जेव्हा दिलीप सावंत माझी भेट घ्यायचे, तेव्हा हळदीचे नेरूर पुलाचा विषय माझ्या डोक्यात यायचा. त्यांचा फोन आला तरी पुलाच्या कामाबाबतच असेल, असे मला वाटायचे,” असे त्यांनी नमूद केले.




मागील दहा वर्षांत अनेक विकासकामे रखडली




कुडाळ-मालवण मतदारसंघात मागील दहा वर्षांत अनेक विकासकामे रखडली असून, ती पूर्ण करण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे आमदार राणे यांनी सांगितले. “लोकांनी मला काम करण्यासाठी निवडून दिले आहे, टीका करण्यासाठी नाही. हा पाच कोटी रुपयांचा पूल पूर्ण केल्यानंतर त्यालगतचा रस्ताही पूर्ण करण्याचा माझा मानस आहे,” असे ते म्हणाले.




“या पुलाचे काम झाले म्हणजे गावातील सर्व प्रश्न सुटले असे नाही. मतदारसंघातील अनेक कामे अद्याप करायची आहेत. मागील दहा वर्षांत कुडाळ-मालवण मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला. २०२४ पासून हा मतदारसंघ पुन्हा विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू केले आहे. मतदारसंघाचा विकास काय असतो, हे दाखविण्यासाठी माझी धडपड सुरू आहे. मी माझे कर्तव्य बजावत आहे; कोणावरही उपकार करत नाही,” असे राणे यांनी सांगितले.




दीड वर्षातील कामांचा हिशेब मागणाऱ्यांचे आव्हान स्वीकारले




आपल्या दीड वर्षांच्या कार्यकाळातील कामांचा हिशेब मागणाऱ्यांचे आव्हान आपण स्वीकारले असल्याचेही आमदार राणे यांनी स्पष्ट केले. “पुढील दीड वर्षांत निलेश राणे या मतदारसंघात काय काम करतो, हे जनतेने पाहावे. माझ्यावर दररोज टीका केली जाते. ज्यांनी दहा वर्षांत काही काम केले नाही, ते आता माझ्याकडे दीड वर्षाचा हिशेब मागत आहेत. त्यांचे आव्हान मी स्वीकारले आहे,” असे त्यांनी सांगितले.




पुढील पाच वर्षांत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे करण्याचा निर्धार व्यक्त करताना राणे म्हणाले की, आपली स्पर्धा कोणाशी नसून विकासाच्या कामाशी आहे. विधानसभेत प्रश्न मांडताना आपण कोणत्या बाकावर बसतो, यापेक्षा मतदारसंघाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पक्षाचे नेते नारायण राणे यांनीही मतदारसंघाला प्राधान्य देण्याचे सांगितल्याचे त्यांनी नमूद केले.




“माझी स्पर्धा कोणाशीच नाही”




“माझी स्पर्धा कोणाशीच नाही. मी येथे २५ वर्षे टिकण्यासाठी आलो नाही. जनतेने मला पाच वर्षांसाठी निवडून दिले आहे. ज्या मतदारसंघात माझ्या वडिलांचा पराभव झाला, त्याच मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिले. सिंधुदुर्गातील जनतेने माझ्या कुटुंबाला मोठे प्रेम दिले आहे. या प्रेमाची परतफेड आम्ही आयुष्यभर करू शकत नाही,” असे आमदार राणे यांनी सांगितले.




“टाळंबा प्रकल्प होऊ देणार नाही”




टाळंबा प्रकल्पाबाबतही आमदार राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “टाळंबा प्रकल्प होणार नाही, हे निश्चित आहे. मी जिवंत असेपर्यंत हा प्रकल्प होऊ देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले.




२०१४ पासून या भागाच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे सांगत राणे म्हणाले की, कुडाळ-मालवण मतदारसंघात उच्च दर्जाची कामे करण्यावर भर दिला जाणार आहे. मागील दहा वर्षांत कणकवली आणि सावंतवाडी मतदारसंघात विकासकामे झाली; मात्र कुडाळ-मालवणमध्ये अपेक्षित विकास झाला नाही, असा आरोप त्यांनी केला.




मतदारसंघासाठी येणारा निधी आणि जिल्हा नियोजनच्या आराखड्यातील तरतुदी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “आज कुडाळ-मालवण मतदारसंघाचा विकास आराखडा हजार ते बाराशे कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र, यावर थांबायचे नाही. हा आराखडा किमान पाच हजार कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे राणे यांनी स्पष्ट केले.




महायुती सरकारच्या माध्यमातून विकासाला गती मिळत असून, जिल्हा परिषदेचे कामही पारदर्शकपणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात जिल्हा परिषदेसाठी ५० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले असून, हा निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

दादा सारंग

दादा सारंग

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

नवीनतम अद्यतन

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती
राजकीय

डॉ. ऋषिकेश केळकर यांच्यावर भाजपची राज्यस्तरीय जबाबदारी; वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी नियुक्ती

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!
प्रशासन

देवगडच्या समुद्रात बेकायदा ट्रॉलिंग करणारी कर्नाटकची ‘श्री अनघा’ नौका जप्त!

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!
प्रशासन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात अणसूर ग्रामपंचायतीची जिल्ह्यात बाजी!

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
प्रशासन

पोलिसांच्या कल्याणासाठी भविष्यातही स्वतंत्रपणे निर्णय घेणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

ANCHOR AD SLOT