कुडाळ प्रतिनिधी✍️: कुडाळ तालुक्यातील नेरूर चव्हाटा बाजारपेठेत माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे व्यापारी तसेच ग्राहक त्रस्त झाले आहेत. बाजारपेठेत माकडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम होत आहे. या गंभीर समस्येची दखल घेत जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी वनविभागाकडे निवेदन देत माकडांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
नेरूर चव्हाटा बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी ठेवलेली फळे, भाजीपाला, खाद्यपदार्थ तसेच अन्य वस्तू माकडे बिनधास्तपणे उचलून नेत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. माकडांची संख्या अधिक असल्याने त्यांना हुसकावून लावणे व्यापाऱ्यांसाठी कठीण बनले आहे.
केवळ दुकानांमधील वस्तूंची नासधूस किंवा चोरीपुरताच हा उपद्रव मर्यादित नसून, बाजारपेठेत येणाऱ्या प्रवाशांच्या हातातील बॅगाही माकडे अचानक हिसकावून घेऊन पळत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहक आणि प्रवाशांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सततच्या त्रासामुळे नेरूर चव्हाटा बाजारपेठेतील व्यापारी आणि ग्राहक मोठ्या अडचणीत सापडले असून, वनविभागाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी वनविभागाला पत्र देऊन या प्रकरणी तातडीने लक्ष घालावे, तसेच वनक्षेत्रपालांनी प्रतिबंधक उपाययोजना करून माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे. व्यापारी आणि ग्राहकांना माकडांच्या उपद्रवापासून दिलासा मिळावा, यासाठी वनविभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.